ऊर्वी                        सुट्टी संपवुन आता परतीचे वेध लागले. सोलापुर-पुणे पॅसेंजरने भिगवणला उतरलो.घाईघाईने रिक्षा पकडली व मधल्या सिट्वर टेकुन हुश्श केलं. रिक्षा भरायला आणखी थोडा वेळ होता,इतक्यात एक मुलगी व बरोबर दोन मुले घेऊन घाईने येऊन मागे बसली. कपाळावरचा घाम पदराने पुसत ती पदराचा वारा घेत पोरांना डटावतं इकड – तिकडं पाहू लागली. तिच्याकडे लक्ष जावं असं काही विशेष नव्हतं,पणं तिची दोन मुले गोंधळाने लक्षं वेधुन घेत होती.तिच्या शेजारी एक शेतावरची राबणारी म्हातारी येऊन बसली आणि रिक्षा सुरु झाली.

                        पंधरा मिनिटाच्या प्रवासात सुरुवातीला कुणी बोलतं नव्हतं. सर्व जण आप-आपल्या कामात मग्न होते. माझा शेजारी जाडं भिंगाची काचं असलेला चेषमिश आणि डाव्या बाजूस जूनाचं पेपर वाचत बसलेला रेल्वे कर्मचारी. मागे बसलेल्या म्हातारीने तिची चंची खोलली, तिच्यातील तंबाखू मळत-मळत उगाचं विषय काढला.

                        कायं गं पोरी, कुठली म्हणायची….? म्हातारी.

                        उंब्रजची…

म्हातारीनं तिरकसं नजर टाकत तिच्याकडे पाहीलं, आणि तंबाखू दाढेत ठेवतं विचारल..

                        ही चिलीपिली तुझीच हायत व्हंय….? म्हातारी.

                        व्हंय… पोरीनं छोट्या पोराच्या नाकातला शेंबूड पदराने पुसत सांगितलं….

                        नवरा कुठंय….? म्हातारी.

                        मेला…..

                        ऑ……?

                        एवढ्या लवकर…..? काय झालंत त्याला….? म्हातारीने संशयाने बघितलं

                        गाववाल्यांनी मारला…. ती.


                        म्हातारी आणखी काही विचारत होती पण स्टॉप आला. सर्वानी आप –आपले सामानं काढली व आप- आपल्या मार्गाला लागली, म्हातारीनं जपूनं जाण्याचा तिला सल्ला दिला आणि आपल्या मार्गाने ती निघून गेली.मीही बारामतीला जाण्यासाठी स्टॉपवर आलो.ती आपली लहानगी मुलं संभाळत तिच्या स्टॉपकडे निघाली. काही वेळानंतर ती बारामतीच्या स्टॉपकडे आली. मला नवलं वाटल आणि कुतुहलंही…

                        का बरं ती इकडे आली असावी…? इतक्यात जोराचा वारा सुटला आणि पाऊस सुरु झाला.तिची मुलांना संभाळण्याची कसरत सुरु झाली. भिगवण- बारामती बस आली म्हणूनं मी पाऊसात धावतं बस पकडू लागलो. स्टॉपवर वर्दळ नसल्याने चालकाने गाडी न थांबवता तो निघून गेला. त्याला शिव्याची लाखोली वाहतं मी पुन्हा स्टॉपकडे परत आलो.

                        स्टॉपवर ती, शेजारी एक माणूस,स्टॉपच्या भिंतीला खेटूनं पदरानं तोंड गुंडाळलेली बाई सोडलं तर कुणीही नव्हतं मी पुढची बस येईल की नाही या विवंचनेत विचार करत बसलो होतो. पावसाचा जोरं वाढतच होता. आता अंधार दाटू लागला होता.तो शेजारी व ती बाई एक दोन करत – करत निघुन गेले. आता फक्त ती मुलगी, तिची मुलं आणि मी होतो.

                        मी विचारात मग्न होतो, इतक्यात कोणीतरी जवळ येऊन खांद्याला हलवतयं याची जाणीव झाली, मी झिडकारुनं पाहिलं तर तिचा तो मुलगा बोट दाखवत रडू लागला. हो.. तो माझ्या बॅगेमधला डोकावणारा बिस्कीट पुडा पाहत होता. हा पुढा मी काकांच्या छोट्या मुलींसाठी घेतला होता पण बाहेर काढायची आठवणंच झाली नाही. तो तसाचं राहिला. बॅगेची चैन थोडी उघडी होती, त्यातून तो पुढा दिसतं होता. मुलगा हट्ट करु लागला, तसां आईने त्याला धुपाटण्यासारखा धुपाटला. पोरंग आता सूर धरुन रडू लागलं. गप्प बसेना हे पाहून तिनं त्याला पदराखाली घेतलं. आणि आता तिची नजरही त्या पुढ्याकडे जाऊ लागली.मी तिला तो देऊ केला. तिनं तो घेतला नाही. म्हटंल राहू दे. जरा आढ्वेढं घेत तिनं तो पुढा घेतला आणि पिशवीतल्या साडीखाली कोंबला.

                        काही वेळ गेला एस. टी अजून येत नव्हती. ती मुलगीही डुलक्या घेऊ लागली.पाऊसाचं पाणी आता शेडमध्ये येऊ लागलं तशी ती उठली व शेजारी येऊन बसली. मगाच कुतुहलही अजुन तसच होतं.

                        गावाला गेला नाही ….? मी आपलं सहज म्हणूनं विचारलं

                        न्हायं यस्टी आधीच गेलती….

                        मग आता कसं जाणारं गावाला…..?  मी

                        सकाळी सातची डायरेक गाडी हायं …..

      ती रात्रभर त्या स्टॉपवर राहणार होती. तिच्या त्या विषयावर बोलण्याची गरज वाटली नाही.

                        घरी तरी जाऊन करायचय काय…?  ती

                        अगं सासू सासरे, घरातले सगळे वाट पाहत असतील नां…  मी

                        सासू सासरा मळ्यात वायलं राहत्यात. हामी गावात राहतू.

विजेच्या कडकडात तिच्याकडे पाहीलं, वय अंदाजे २० ते २१ वर्ष असावं शिडशिडीत, काहीसा सावळा वर्ण आणि २ मुलांची आई एवढं अपरीपक्व वैशिष्ट्ये तिच्या सोबतीला होती.

                        सासू- सास-याकडे का राहत नाही….? मी

                        हाडूळ हायती दोघं… रागात तिची कानशिलं तापू लागली..

पोरगं परत रडू लागलं. सासू – सास-याचा राग तिन मुलावर काढला, परत तेच नाटक चालू झाल, परत तिने पोराला पाजायला घेतलं. आता तिच्यातली अपरीचिताची भावना गळून पडली. तिच्या मनाला मोकळा करणारा विषय मिळाला होता. मलाही काही प्रश्न विचारायची गरज भासली नाही.

      जात येगळी होती आणि माझ्या बानं हुंडा दिला नव्हतां आणि काय देणारं वो सायेब.. बाप दुस-याच्या शेतावर राबतूं आणी आयं खुरपाया जाती, शिजन आसल तर पैका मिळतो ब-यापैकी, नायतर घरातच बसुन राहयची आय.बाप शेतावर राबायचा. मोकळा वेळ मिळाला तरं करमाळ्याला हमाली करायचा. म्या सातवीत असतानाचं बानं लगीन ठरवलं मुकाट आयकून घ्यावं लागलं.

                        तुमच्याकडं होत्यात का वो इतक्या लवकर लग्न….? स्टोरी सांगता-सांगता तिनं अचानकं सवाल केला. मी गडबडलो.. अचानकं आलेल्या प्रश्नावर कशी प्रतिक्रिया द्यावी.. आम्ही पण गावाकडे राहतं होतो पण गावाला सुधारणांच वारं लागल होतं. माझ्या बॅचची काही अपवाद वगळता सर्वच मुले- मुली किमान दहावी पास होती.

                        मी उत्तर द्यायच्या आत तिची स्टोरी पुन्हा सुरु झाली.

                        “पनं माझं झालं… सास-यानं बां ला दहा हजार हुंडा मागितलां. सास-यानं बैठक मोडली,पण ह्याच्या मनात मी भरली हुते. ह्यानी हेकाच धरला, हिच्याशीच लग्न करणार म्हणूनं. नव-यानं त्या वेळी आठवीतनं शाळा सोडली होती. आणि गावात चकाट्या पिटण्याच काम करायचा. सास-यानं त्याला सरपंचाकरवी गावातल्या शाळतं लावला. पैका हातात खेळू लागला. सास-याच दारुचं यसन पोरानं बरुबर उचललं.. बापाचं आणं नव-याच रोज खटकं उडू लागलं. घसरुन बाप पोरावर वरडायचां,”

                        हिच्या आयला ह्या रांडनच तुला बाटीवलायं…. बायकूच्या हातचं बाहूलं झालायं तू….? कोण कुठली हाडळ… म्हनत सास-यान माझ्या झिंज्या धरुन माराय लागला. नव-यानं त्याला माग वढलं आणं बापाचं थोबाड रंगवलं…. आणं पेकाटात लाथ मारली. आईवर शिवी हासडून घराभाईर काढला. दुस-या दिशी सास-यानं सासूला घेऊन मळा गाठलां. म्या आपलं का उग मंधी पडा म्हणल, गप्प रायले.

                        नव-याची दारु वाढत चालली व्हती. त्या लयं समजाऊन सांगितलं, सुदीत असताना लय ग्वाडं बोलायचा. पण पिऊन आल्यावर सैतानासारखा वागायचां.आंगाची वढं लागल्यावरबी सैतानासारखा वागायचा. मला आपलं रडू यायचं. पण नवरा काय आयकतोय..

                        गावातल्या पंचानी नव-याला दमात घेतला.बायकूला डोक्यावर चढवू नगूसं… नायतर तुझा निर्णय माला करावा लागलं काय न काय.. नव-याला नौकरी व्हती म्हणून काय आढलं नायं.

                        एका दिशी नवरा घाबरतं घाबरतं आला आणं म्हणाला,

                        ऊर्वे,ऊर्वे कुठ जाऊ नगसं… गाववाल्यांचा काय भरवसा नाय. आपल्या जिवाला धोका हाय. घरातलं काय सामानं आसलं तर मला सांगत जा. पोरांना खेळायला नगो सोडू… म्या बै लयं घाबरले… ह्यांच्या कपाळावर घाम बघितला आणि माझ काळीजच फाटलं. ह्याच्या छातीवर डोक टेकवलं तरं ह्यांच काळीज जोरात वाजत हुतं.

                        दुस-या दिशी शेजारची बाईडी वरडंत वरडंत आली.

                        ऊर्वे, ऊर्वे….. तुझ्या नव-याचा जीव घेतला की गं लोक्कांन… म्या आपली पळत पळत चौकाकडं गेले. तं नवरा मरणाच्या दारात हुता, लोकं जमली होती. लोक्कांनी गर्दी केली होती तमाशा बघाया. नव-यान जीव सोडला आणि म्या चक्कर येऊन चौकातच पडले. सुदीवर आल्यावर करमाळ्याच्या हास्पिटलात होते. म्या रडून रडून गळून गेलते. पोस्ट्मार्टेम झाला. त्या लोकांना अटक झाली. म्या आत्ता पक्की रांड झाली साहेब.. सास-यान अजून ढूंकुनबी बघीतलं नायं. नवरा गेला साहेब… कसं जगायचं आता कुणा ठावं. बा पणं ठिवून घेयना.. आले परत… सांगा सायेब मी काय करु….. थोडा वेळ ती रडतं राहीली.. नंतर शून्यात ती बघत राहीली. मला तिचे सांत्वन कसे करावे किंवा काय सल्ला द्यावा हे समझेना.

                        पावसाने आता उघडीप दिली. पत्र्यावरचं पाणी खाली गळतं होतं.सावरतं तिनं पोराला सरळ केलं. शेजारी निजवलं आणि भिंतीला टेकून बसली. मी तिला १०० ची नोट दिली. ती लाजली शरमेनं मान खाली घातली. मी म्हंटल, राहू दे माझ्या बहिणीसारखी आहेस. मुलांना खर्चाला राहू दे.आढवेढं घेत ते पैसे तिने घेतले. काही अंतरावरच्या हॉटेलामधून तिला गरमा- गरम भजी घेऊन दिली. ती लोकं फार भुक्याजली होती. या अल्पोपहारामुळे काही अंशी भुक भागेल याचं समाधान घेऊन मी बसची वाट पहातं होतो. रात्री ८ वाजताची करमाळा- सातारा बस होती. बरोबर ८.०५ ला बस आली. तिला काळजी घे सांगून बसमध्ये बसलो. जाताना तिला पाहिले असता खिन्न भाव तिच्या डोळ्यात आणि चेह-यावर स्पष्ट दिसतं होते.

                        निसर्गाने सर्वाना सारखेच केले आहे. तरी उच्च नीच, गरीब श्रीमंत अशा भावनांनी माणसाला पोखरुन काढले आहे. ऊर्वीच्या ऊर्वरित आयुष्याबद्दल विचार केला तर, वयाच्या २१ व्या वर्षी की जे वयं आता शारीरिक, भौतिक सुखासाठी आसुसलेले असते,त्या वयात नव-याचं जग सोडुन जाणं, सासू सास-याचा आधार नसणं यात तिची किती कुचंबणा होत असेल..? शरीराच्या भावना इतरांबरोबर व्यक्त करायला आपला शहरातला समाजही घाबरतो तेथे ऊर्वी सारख्या ग्रामीण स्त्रीची काय कथा..? ऊर्वी अशीच राहील, समाज तिचा वापर करेल किंवा ती वाम मार्गाला लागेल यातील एक गोष्ट न घडल्यास नवलं….

                        पेन्सिल चौकात बस थांबली व मी उतरलो तरीही ऊर्वीचा विचार अजून डोक्यात घोळतं होता….


उदय कोठारी.

                                                                                                      

0 comments:

Powered by Blogger.